आरे वसाहत येथे काँक्रिटीकरणाच्या कामात RG Shah Infratech कंपनी वर गुणवत्ता न राखल्याने कारवाई.
मुंबई : गोरेगावच्या आरे वसाहतीतील
मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात गुणवत्ता न राखल्याने कंत्राटदारावर आणि त्याच्यावर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेवर पालिकेने कारवाईचा हंटर उगारला आहे. संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यासह त्याने स्वखर्चाने काँक्रिट रस्त्याच्या बाधित भाग पुन्हा नव्याने तयार करावा, असे निर्देश दिले आहेत.
पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाने कंत्राटदारामार्फत आरे वसाहतीतील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आरे वसाहत
मुख्य रस्ता (दिनकरराव देसाई मार्ग) W/382 कार्यादेश अंतर्गत पश्चिम द्रुतगती महामार्गापासून मोरारजी नगर पर्यंत काँक्रिटीकरण व इतर ठिकाणांच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी काही ठिकाणी काँक्रिट रस्त्यांना मोठ्या, तर काही ठिकाणी किरकोळ भेगा। पडल्याचे, तडे गेल्याचे तर काही ठिकाणचा पृष्ठभाग जीर्ण झाल्याचे आढळले.
सध्या बाधित रस्त्याच्या खर्चाची रक्कम दंड म्हणून कंत्राटदाराच्या बिलामधून वजा करण्यात येणार आहे. तसेच रस्त्याच्या कामात पुन्हा त्रुटी केल्यास दुप्पट दंड आकारण्याचा तसेच, तिसऱ्यांदा त्रुटी केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
देखरेख संस्थेलाही दंड
या प्रकरणात गुणवत्ता देखरेख संस्था कंत्राटदाराकडून नियमानुसार गुणवत्तापूर्ण कामे करवून घेण्यास अपयशी ठरली आहे. त्यामुळे या संस्थेलाही दंड आकारण्यात आला असून दुसऱ्यांदा ही दंडाची रक्कम दुप्पट करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर तिसऱ्यांदा त्रुटी आढळल्यास, भविष्यात पालिकेच्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यास अपात्र ठरविण्यात येईल, असा सक्त इशाराही गुणवत्ता देखरेख संस्थेस देण्यात आला आहे. तसेच, या कामात उणीवा राहणार नाहीत, यासाठी अधिक दक्ष राहून काम करावे, अशी लेखी समज संबंधित अभियंत्यांना दिली आहे.
‘कामात कुचराई, हलगर्जीपणा आणि दर्जा नित्कृष्ट नको’
W 382 निविदेतील अटी-शर्तीनुसार गुणवत्ता देखरेख संस्थेने कंत्राटदाराकडून गुणवत्तापूर्ण कामे करवून घ्यावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असे बजाविण्यात आले आहे. पालिका अभियंत्यांनी काँक्रिटीकरण कामात कोणत्याही उणिवा राहणार नसल्याची काळजी घ्यावी, अशी सक्त ताकीद नवनियुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.